ब्रम्हपुरीत महसूल सप्ताहात M-Sand धोरणाची अंमलबजावणी; पर्यावरणपूरक पर्यायासाठी प्रशासन कटिबद्ध
ब्रम्हपुरी प्रतिनिधी / रोशन खानकुरे:
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार ब्रम्हपुरी तालुक्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, दिनांक 7 ऑगस्ट रोजी तालुक्यात M-Sand (कृत्रिम वाळू) धोरणाची अंमलबजावणी करण्यासंबंधी नियोजन करण्यात आले.
29 जुलै 2025 रोजी शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2025/प्र.क्र.162/आस्था-01 (ई-1) व 23 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, M-Sand धोरणासाठी मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित करण्यात आली आहे. या धोरणाचा उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक बांधकामासाठी नैसर्गिक वाळूला योग्य पर्याय तयार करणे.
प्रशासनाने सांगितले की, वाळू ही पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण घटक असून ती मुख्यतः नद्यांच्या पात्रात आढळते. मात्र, नद्यांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक वाळूचा वापर मर्यादित करणे आवश्यक आहे. परिणामी, कृत्रिम वाळू म्हणजेच M-Sand हा एक प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे.
राज्यात वाळूची उपलब्धता कमी असल्याने व वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर M-Sand चा वापर अपरिहार्य ठरत आहे. न्यायालय व शासनाने लागू केलेल्या पर्यावरणपूरक मानकांमुळे नैसर्गिक वाळूच्या उपसात अडथळे येत आहेत. अशा परिस्थितीत दर्जेदार M-Sand चा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.
या धोरणाविषयी माहिती देताना उपविभागीय अधिकारी मा. पर्वणी पाटील व तहसीलदार मा. सतीश मासाळ यांनी सांगितले की, M-Sand ही नैसर्गिक वाळूची योग्य व पर्यावरणपूरक पर्यायी सामग्री असून तिचा उपयोग वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महसूल विभागाने प्रभावी नियोजन आखले आहे.













