राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी येथे शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थिनींना गोटुंबे आखाडा येथील बसथांब्यावर अलीकडच्या काळात छळवणुकीचा सामना करावा लागत असून, बसथांबा परिसरातील काही टवाळखोर तरुणांकडून सातत्याने शालेय विद्यार्थिनींना मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या घटनांमुळे विद्यार्थीनी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही तरुणी अक्षरशः या तरुणांना वैतागुन रडत प्रवास करत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. परंतु तक्रार केल्यास आमच्या शिक्षणावर गदा येवू शकते या भीतीने तरुणी जीव मुठीत धरून बसने प्रवास करत शिक्षण पूर्ण करत आहेत.
विद्यार्थीनी बसने प्रवास करण्यासाठी गोटुंबे आखाडा येथील बसथांब्यावर उभ्या असतात त्याचवेळी बसथांबा परिसरातील ते टवाळखोर तरुण बसथांब्यावर थांबून विद्यार्थिनींकडे टक लावून पाहणे, अशोभनीय इशारे करणे, अश्लील भाषा वापरणे, मोबाईलद्वारे वॉचविंग करणे अशा प्रकारच्या विकृतीपूर्ण वर्तनात गुंतले आहेत. यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकारांबाबत नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी संबंधित तरुणांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.या गंभीर प्रकारांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. मुलींना सुरक्षित वातावरण देणे ही केवळ शाळा किंवा पालकांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. संबंधित यंत्रणांनी वेळीच पावले उचलून टवाळखोरांना रोखल्यास भविष्यातील संभाव्य घटना टाळता येऊ शकतील, असेही नागरिकांनी नमूद केले.
गोटुंबे आखाडा बसथांब्यावर शालेय विद्यार्थिनींना टवाळखोर तरुणांचा मानसिक त्रास ; टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त करण्याची विद्यार्थिनींची मागणी

0Share
Leave a reply












