चंद्रपूर प्रतिनिधी / रोशन खानकुरे : एकेकाळी शांत आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याची प्रतिमा सध्या डागाळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीने टोक गाठले असून, विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती चिंताजनक बाब बनली आहे. चाकू, बंदुका आणि तलवारींसारखी घातक शस्त्रे खुलेआम घेऊन फिरण्याचे प्रकार वाढले आहेत, तर किरकोळ वादातून खुनासारख्या गंभीर घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका मुलाने बापावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना ताजी असतानाच, मित्रानेच मित्रावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकारही समोर आला आहे. या घटना चंद्रपूरमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
गुन्हेगारी वाढीमागे अनेक कारणे
या वाढत्या गुन्हेगारीमागे अनेक कारणे असल्याचा कयास लावला जात आहे. बेरोजगारी, अंमली पदार्थांचा वाढता विळखा, अवैध धंद्यांचा सुळसुळाट आणि अवैध दारू व दारू तस्करीचा वाढता व्यवसाय ही काही प्रमुख कारणे मानली जात आहेत. अनेक तरुणांना योग्य रोजगार मिळत नसल्याने ते नैराश्यातून किंवा पैशांच्या मोहापायी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, जिल्ह्यात काही ठिकाणी खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे आणि अंमली पदार्थांची विक्री याला खतपाणी घालत असल्याची चर्चा आहे. विशेषतः गांजा, एम.डी. सारख्या ड्रग्जचा आणि अवैध दारूचा सर्रास वापर वाढल्याने, या व्यसनांसाठी पैशांची पूर्तता करण्याकरिता तरुण चोरीसारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये ढकलले जात आहेत. घरफोड्या, वाहनचोरी आणि पाकीटमारीचे प्रकार नित्याचे झाले असून, यामुळे नागरिक धास्तावले आहेत. दारूच्या अतिसेवनामुळे घरगुती हिंसाचार आणि कौटुंबिक वादही वाढत आहेत, ज्यामुळे सामाजिक शांतता भंग होत आहे.
या गंभीर परिस्थितीला काही प्रमाणात राजकीय वरदहस्त देखील कारणीभूत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. जर गुन्हेगारांना राजकीय नेत्यांचे अभय मिळत असेल, तर त्यांना कायद्याचे भय वाटणार नाही आणि गुन्हे करण्याचे त्यांचे धाडस वाढेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
MIDC ओस, रोजगार निर्मितीची गरज
चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगारी हे गुन्हेगारी वाढीचे एक प्रमुख कारण बनले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहती (MIDC) सध्या ओस पडल्या असून, त्या ठिकाणी गुरे-ढोरे चरताना दिसतात. जर या ओस पडलेल्या MIDC मध्ये नवीन कारखाने आणले गेले आणि रोजगाराची संधी निर्माण झाली, तर तरुण पिढीला चांगल्या दिशेने वळण्यास मदत होईल. यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि गुन्हेगारीकडे जाण्याचा धोका कमी होईल.
नागरिकांकडून चिंता आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी
चंद्रपूरच्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. “ही परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास चंद्रपूरची शांतता धोक्यात येईल,” असे मत एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केले. यावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास जिल्ह्याची वाटचाल एका गंभीर संकटाकडे होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करणे, गांजा, ड्रग्ज आणि दारूच्या तस्करीवर आळा घालणे, शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे आणि गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्यास ते थांबवणे, यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. तरुण पिढीला गुन्हेगारीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती यावरही भर देणे गरजेचे आहे, विशेषतः ओस पडलेल्या MIDC मध्ये नवीन उद्योग आणून रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे.
चंद्रपुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर: तरुण पिढी गुन्हेगारीच्या खाईत, बेरोजगारी मुख्य कारण

0Share
Leave a reply












