राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून एका विवाहितेने झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १४ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव कविता संतोष मुंगसे (वय अंदाजे ४०) असे आहे.कविता यांचा मुलगा अजय मुंगसे (वय १८) याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील संतोष रामदास मुंगसे हे नेहमी दारुच्या नशेत पत्नी व मुलाला कोणतेही कारण नसताना मारहाण करत असत. त्यांनी घरात तलवार, कत्ती, कुऱ्हाड, कोयता अशी हत्यारेही बाळगलेली होती व वेळोवेळी त्याचा वापर करत असत. दि. १३ जुलै रोजी रात्री आणि १४ जुलै रोजी सकाळी संतोषने दारूच्या नशेत पत्नीला पुन्हा एकदा मारहाण केली. त्यानंतर कविता यांनी घरातून बाहेर पडत ब्राम्हणी शिवारातील शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुपारी चार वाजता ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तत्काळ वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर ब्राम्हणी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.घटनेनंतर आरोपी संतोष मुंगसे हा घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी तत्परतेने शोधमोहीम राबवत त्याला अटक केली.
या प्रकरणी अजय मुंगसे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८७/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम १०८, ३५१(२), ३५२ अन्वये मारहाण व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत.
Leave a reply













