राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शहरातील सोनार गल्ली येथील ५० वर्षीय हॉटेल व्यावसायिक राजेश धनंजय नगरकर यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी दुपारी उघडकीस आली.राजेश नगरकर हे काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते आपल्या राहत्या घरी गेले आणि तिसऱ्या मजल्यावरील खोलीत नायलॉन दोरीने पंख्याला गळफास घेतला. ही घटना त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील श्रेयस लोळगे, राजू बुऱ्हाडे, सचिन बुऱ्हाडे, सोमा गुजर यांच्यासह इतरांनी तातडीने धाव घेतली आणि नगरकर यांना खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते व पोलीस नाईक नदीम शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.राजेश नगरकर हे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अजय नगरकर यांचे लहान भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भाऊजया, पुतणे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रुग्णालय परिसरात सामाजिक कार्यकर्ते पांडुभाऊ उदावंत, नारायण धोंगडे, स्वप्नील भालेकर, शंकर दाभाडे, सौरभ दुधाडे, मनोज आंबिलवादे यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली होती.
Leave a reply













