तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील डॉ साधना खजूरे या लेकीचा मुंबई येथे आरोग्य विभागाकडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गौरव करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला डॉक्टरांचा राज्यस्तरीय गौरव सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावच्या सुपुत्री डॉ. साधना सिद्रामप्पा खजूरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातून निवड झालेल्या अवघ्या पाच महिला डॉक्टरांमध्ये त्यांचा समावेश असून, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेची राज्यस्तरावर पहिले स्थान देऊन दखल घेण्यात आली.
सध्या सातारा येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत असताना डॉ साधना खजूरे यांनी आतापर्यंत ८७० हून अधिक यशस्वी सिजेरियन शस्त्रक्रिया करून अनेक मातांना व नवजात बालकांना सुरक्षित जीवनदान दिले आहे. अत्यंत जबाबदारीने, समर्पण भावनेने आणि सेवाभावातून केलेल्या या कार्यामुळे त्या आरोग्य क्षेत्रात आदर्श ठरत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर,विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. साधना खजूरे यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधिलकीही तितकीच उल्लेखनीय आहे. त्यांचे वडील डॉ सिद्रामप्पा खजूरे हे ज्येष्ठ समाजसेवक म्हणून परिचित असून समाजहिताच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. समाजसेवेची हीच प्रेरणा घेऊन डॉ. साधना खजूरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेला प्राधान्य देत उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. खुदावाडी सारख्या ग्रामीण भागातील लेकीने सातारा शहरात वैद्यकीय सेवेचा उत्कृष्ट ठसा उमटवत राज्यस्तरावर मानाचा सन्मान मिळविल्याने खुदावाडी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खुदावाडीच्या लेकीचा मुंबईत राज्यस्तरीय सन्मान; ८७० यशस्वी सिजेरियन शस्त्रक्रियांची दखल, डॉ साधना खजूरे ठरल्या महाराष्ट्रात अग्रस्थानी

0Share
Leave a reply












