SR 24 NEWS

सामाजिक

महिला दिनानिमित्त माळशिरस येथे महिलांना सक्षमीकरण व स्वयंरोजगाराचे धडे ; आरी वर्क प्रशिक्षण व आंब्याच्या रोपांचे वाटप

Spread the love

 प्रतिनिधी (प्रविण वाघमोडे) : ग्रामपंचायत माळशिरस (ता. पुरंदर) आणि स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था, मदनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त माळशिरस गावातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महिलांना विविध व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आंब्याच्या रोपांचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमात महिलांना आरी वर्क (Aari Work) या हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाद्वारे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य मिळावे आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. सध्या आरी वर्क डिझाईनला मोठी मागणी असून अनेक महिला या व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी व झाडांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या रोपांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमात ग्रामपंचायत अधिकारी विलास बडदे यांनी महिलांसाठी शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच गावाच्या लोकनियुक्त सरपंच आरतीताई यादव यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात पुढे यावे असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील यांनीही महिलांना मार्गदर्शन करत महिलांनी आत्मनिर्भर बनण्यावर भर दिला.या कार्यक्रमाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी माळशिरस (ता. पुरंदर) गावच्या लोकनियुक्त सरपंच आरतीताई यादव, ग्रामपंचायत अधिकारी विलास बडदे, संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील, संस्थेचे सचिव धीरज सोट पाटील तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!