सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू व मटका धंद्यावर सोनई पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गावठी दारू जप्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ रोजी पानसवाडी गावच्या शिवारात टपरीच्या आडोशाला छापा टाकून सागर गणपत जाधव (वय ४३, रा. पानसवाडी, ता. नेवासा) यांच्या ताब्यातून सुमारे २० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर दुसरी कारवाई महालक्ष्मी हिवरे येथील गावशिवारात करण्यात आली. येथे अंबादास रामदास सांगळे (वय ४०, रा. महालक्ष्मी हिवरे) यांच्या ताब्यातून सुमारे ३० लिटर गावठी दारू जप्त करून त्यांच्याविरुद्धही सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत मुळा कारखाना परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी विजय सयाजी कांबळे (वय ५५, रा. मुळा कारखाना) हा मटका खेळताना व खेळविताना आढळून आला. त्याच्याविरुद्धही सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनई पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून, पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती देत “अवैध धंदेवाल्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी दिला आहे.या प्रकरणी पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सोनई पोलिसांची अवैध दारू व मटका धंद्यावर दमदार कारवाई, “अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही” – सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे

0Share
Leave a reply












