SR 24 NEWS

इतर

अंमली पदार्थ तस्करी व अपहार प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ शामसुंदर गुजर बडतर्फ

Spread the love

अहिल्यानगर  प्रतिनिधी :  अंमली पदार्थ तस्करी तसेच अपहार व फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये थेट सहभाग आढळून आल्याने पोलीस हवालदार (पोहेकॉ) क्रमांक २२०५ शामसुंदर विश्वनाथ गुजर यास शासन सेवेतून बडतर्फ (Dismissed from Service) करण्यात आले आहे.

पोहेकॉ शामसुंदर गुजर याची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथे होती. त्याच्याविरोधात शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक ५३/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८ (ब), २१ (क) प्रमाणे दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, अंमली पदार्थ तस्करीमध्ये शामसुंदर गुजर याचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्टपणे निष्पन्न झाला आहे.

याशिवाय, तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे गुन्हा क्रमांक ७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (५), ३१८ (४) प्रमाणे अपहार व फसवणूक केल्याचा आणखी एक गंभीर गुन्हा दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी नोंदविण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, पोहेकॉ शामसुंदर विश्वनाथ गुजर याच्याविरोधात दाखल असलेल्या गंभीर व नैतिक अधःपतन दर्शविणाऱ्या गुन्ह्यांचा विचार करता, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (ब) मधील तरतुदीनुसार त्यास थेट शासन सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस दलातील शिस्त, विश्वासार्हता आणि कायद्याचे पालन अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर शून्य सहनशीलतेची भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!