प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी येथील कृषी विद्यापीठ परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुमन सुभाष पोपळघट (वय ५०, रा. सावळी विहीर, ता. राहता, जि. अहिल्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुमन पोपळघट या राहुरी कृषी विद्यापीठाजवळून जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील मॅक्स केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी अहिल्यानगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (आ.मृ.) नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास वैराळ पुढील तपास करीत आहेत.
Leave a reply













