SR 24 NEWS

राजकीय

सत्ता-संपत्तीच्या जोरावर जिल्ह्याला दारिद्र्यात लोटले; घराणेशाहीवर घणाघाती टीका – खा. ओमराजे निंबाळकर

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर तब्बल ४५ वर्षे जिल्ह्याला देशात दारिद्र्यात तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवले, मात्र स्वतः श्रीमंतीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले, असा घणाघाती आरोप धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाव न घेता राणादादा पाटील यांच्यावर केला. अणदूर जिल्हा परिषद महाआघाडीचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे तसेच चिवरी पंचायत समिती गणाचे उमेदवार संजय भोसले यांच्या प्रचारार्थ अण्णा चौक, अणदूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र आलूरे होते.

खा. निंबाळकर पुढे म्हणाले की, महाआघाडी ही ग्रामीण भागातील कार्यकर्ता व सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व पुढे यावे, यासाठी निवडणूक लढवत आहे. सत्ताधारी मात्र घराणेशाही जोपासण्यासाठी आणि कुटुंबाचे हितसंबंध सांभाळण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. काम आम्ही करायचे आणि नारळ फोडण्याचे श्रेय त्यांनी घ्यायचे, अशी टीकाही त्यांनी केली.

गेल्या ३६ वर्षांत एकाही गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला डॉक्टर घडवले का, असा सवाल उपस्थित करत वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून वर्षाला सुमारे ९० कोटी रुपयांचा धंदा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेती, शेतकरी, ग्रामीण युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणणे हाच आमचा विकासाचा आराखडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ घोषणा नव्हे तर परिणामकारक बदल हेच आमचे धोरण असून, शेतमालाला योग्य व हमीभाव मिळवून देणे हा आमचा ठाम संकल्प आहे. सत्तेचा उपयोग लुटीसाठी नव्हे, तर लोकसेवेसाठी केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी व्यासपीठावर सरदारसिंग ठाकूर, श्याम पवार, बाळकृष्ण घोडके पाटील, डॉ. पंकज घुगे, धनराज घुगे, बालाजी घुगे, हाजी मलंग शेख, मनोज कस्तुरे, संजू आलूरे, बली मनशेट्टी, प्रताप घोडके यांच्यासह जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!