SR 24 NEWS

इतर

आई राजा उदो उदोच्या जयघोषात चिवरी येथील महालक्ष्मी यात्रा संपन्न,लाखो भाविकांनी घेतले दर्शन; मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हागलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील पशुहत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा आई राजा उदो उदोच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या यात्रोत्सवासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावून देवीचे दर्शन घेतले.यात्रेदरम्यान शेकडो भाविकांनी दंडवत घालून देवीच्या चरणी नतमस्तक झाले. आराधी, वाघ्या, मुरळी, पोतराज यांच्या पारंपरिक गीतांनी व वादनाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्री १२.३० वाजता देवीचा अभिषेक, महापूजा व आरती पार पडली. त्यानंतर गाव ते मंदिर या सुमारे एक किलोमीटर अंतरावर भाविकांनी दंडवत घालत लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडण्याची परंपरा पार पाडली. या धार्मिक विधीत गावातील शेकडो भाविक सहभागी झाले होते.

मंगळवारी दिवसभर नवीन पोतराजांना दीक्षा देणे, लहान मुलांचे जावळ काढणे, मानकरी वाणी पाटील व मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे, घोंगड्यात भात झेलण्याचा विधी यासह विविध मानपानाचे कार्यक्रम पार पडले. रात्री दहा वाजता होम-हवन व अन्य धार्मिक विधी झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर शोभेच्या दारूकामासह हलगीच्या गजरात श्री महालक्ष्मी देवीची पालखीमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

बुधवारी दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पान व लिंबू यांचा घाव घेण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पालखी मानाच्या पुजाऱ्याच्या घरी प्रस्थानासाठी निघाली.यात्रेनिमित्त मंदिर परिसरापासून स्नानगृहापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या यात्रेचे यशस्वी आयोजन सेवानिवृत्त क्षेत्रीय परिवहन अधिकारी पोपट पाटील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर बिराजदार, विवेकानंद पाटील, वसंत काळजाते, भीमा देडे, तुळशीराम शिंदे, ज्ञानदेव झिंगरे, सुरेश भुजबळ, सरपंच शिवकन्या बिराजदार, उपसरपंच लक्ष्मण लबडे, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, अमोल म्हंकराज, युवा नेते पिंटू बिराजदार, शंकर बिराजदार यांच्यासह देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, तंटामुक्ती समिती, युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडले.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळ पासूनच मंदिर परिसरात आई राजा उदो उदोच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!