राहुरी ग्रामीण प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे जमिनीवर झाडे लावण्याच्या वादातून एका वृद्धावर लोखंडी टिकावाने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगन्नाथ विठ्ठल घोलप (वय ६७, रा. मुसळवाडी) हे त्यांच्या शेतातील गट नं. १७१ (१) येथे गेले असता आरोपी मुक्ताबाई अण्णासाहेब घोलप या तेथे झाडे लावत होत्या. यावेळी फिर्यादी यांनी ‘येथे झाडे लावू नका, ही जागा माझी आहे’ असे सांगितल्याचा राग आल्याने मुक्ताबाई घोलप, अण्णासाहेब कारभारी घोलप, रतन अण्णासाहेब घोलप व मिना रमेश घोलप यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी टिकावाने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जगन्नाथ घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध बी.एन.एस. कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कुटे करत आहेत.
राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे जमिनीच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












