SR 24 NEWS

राजकीय

देगलूर–कर्नाटक सीमा मार्गास बजेट मंजुरी; नांदेड–बिदर महामार्गाच्या उन्नतीकरणाला वेग, खा. डॉ. अजित गोपछडे यांनी मानले मुख्यमंत्री व मंत्र्यांचे आभार

Spread the love

नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : देगलूर ते कर्नाटक राज्यसीमा या महत्त्वपूर्ण मार्गाच्या विकासासाठी बजेट मंजुरी प्राप्त झाल्यानंतर नांदेड–बिदर महामार्गाच्या उन्नतीकरणाला नवे बळ मिळाले असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सोमवारी (दि. २२ जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन या विकासकार्याच्या संकल्पनेवर आधारित विशेष स्मृतिचित्र भेट देत त्यांचा सत्कार केला व मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचीही भेट घेऊन या विकासकार्याशी संबंधित विशेष स्मृतिचित्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती मिळवून देण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल खा. डॉ. गोपछडे यांनी त्यांचे आभार मानले.

या प्रकल्पाअंतर्गत देगलूर–करडखेड–मरखेल– हाणेगाव ते कर्नाटक राज्यसीमा या मार्गाचा दर्जेदार विकास करण्यात येणार असून, नांदेड–बिदर महामार्गावरील सुमारे २० किलोमीटरचा अत्यंत जीर्ण व दयनीय अवस्थेतील भाग प्रथमच आधुनिक महामार्गाच्या दर्जानुसार विकसित करण्यात येणार आहे. गत ५० वर्षापासून या मार्गावर सर्वसमावेशक आणि उच्च दर्जाचे काम झाले नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता हा मार्ग नव्या स्वरूपात विकसित होऊन अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देणार आहे.

तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड ते गुरुद्वारा श्री नानक झिरा साहिब, बिदर या दोन महत्त्वाच्या शीख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या मार्गाला धार्मिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देश-विदेशातून दर्शनासाठी येणारे लाखो शीख भाविक, पर्यटक तसेच नांदेड–बिदर मार्गावर नियमित प्रवास करणारे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. सीमावर्ती भागातील व्यापार, पर्यटन आणि सर्वांगीण विकासालाही या प्रकल्पामुळे नवी चालना मिळणार आहे.

या महामार्गाचे व्यापक महत्त्व लक्षात घेऊन प्रकल्पास आवश्यक गती आणि पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी प्रत्यक्ष भेटून मनःपूर्वक आभार मानले.

खा. डॉ. गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एशियन डेव्हलपमेंट बँक सहाय्यित योजनेअंतर्गत या मार्गासाठी आवश्यक निधीला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होणार आहे. परिणामी महाराष्ट्र–कर्नाटक सीमावर्ती भागाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, नांदेड–बिदर महामार्ग भविष्यात आधुनिक, सुरक्षित आणि प्रवाशांना सुखद अनुभव देणारा दर्जेदार मार्ग म्हणून विकसित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या प्रसंगी खा. डॉ. अजित गोपछडे म्हणाले की, “तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड आणि गुरुद्वारा श्री नानक झिरा साहिब, बिदर या दोन पवित्र तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग केवळ रस्ता नसून धार्मिक पर्यटन, सीमाभागातील व्यापार, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला नवी गती देणारा विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे. सीमावर्ती भागाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल.”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!