सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायास २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) छत्रपती संभाजीनगर युनिटच्या पथकाने सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी अजय कृष्णा ठुबे (वय ३९), पोलीस शिपाई, बकल नं. ३२६, शनिशिंगणापूर पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे शनिशिंगणापूर मंदिरासमोर पूजा साहित्याचे दुकान आहे. दुकानासमोर भाविकांची वाहने पार्क होत असल्याने संबंधित पोलीस शिपाई कारवाई न करण्यासाठी दरमहा १५०० रुपयांचा हप्ता घेत असल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. मागील व चालू महिन्याचा हप्ता न दिल्यामुळे आरोपीने तक्रारदारास खोट्या गुन्ह्यात अडकवून कारवाई करण्याची धमकी दिली. तसेच एकूण ३ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट एसीबीकडे धाव घेतली. वरिष्ठांच्या आदेशानुसार एसीबी छत्रपती संभाजीनगर युनिटने तक्रारीची गोपनीय पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपीने ३ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी २ हजार रुपये तत्काळ व उर्वरित १ हजार रुपये नंतर घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
दि. १६ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. शनिशिंगणापूर मंदिरासमोरील ग्रहराज नारळ सेंटर पार्किंग परिसरात आरोपीने तक्रारदाराकडून २ हजार रुपये लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीत २ हजार रुपयांची लाच रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच त्याच्याकडील १५०० रुपये रोख रक्कम व विवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस अटक करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. सदर कारवाईमुळे भाविक व व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
शनिशिंगणापूर येथील पोलीस शिपाई २ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; कारवाई न करण्यासाठी २ हजाराची लाच स्वीकारताना अटक

0Share
Leave a reply












