नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज नवी दिल्ली येथे आपला नामांकन अर्ज दाखल केला. महाराष्ट्राच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नामांकन प्रक्रिया पार पडली.
यावेळी महाराष्ट्रातील २० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. या प्रस्तावक प्रतिनिधी मंडळात राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजाताई मुंडे, मुरलीधर मोहोळ, रक्षाताई खडसे, गणेश नाईक, खासदार डॉ. अजित गोपछडे, अनिल बोंडे, चित्राताई वाघ आदींचा समावेश होता.
नामांकन दाखल करताना मणिपूर राज्याच्या प्रस्तावक प्रतिनिधी मंडळासह भाजपा मणिपूर प्रभारी खासदार डॉ. अजित गोपछडे हे देखील उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक शिस्त, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकशाही प्रक्रियेवरील दृढ विश्वास यांचे दर्शन घडले.
नितीन नबीन यांनी पक्षाच्या विचारधारेवर आधारित मजबूत संघटन उभारणी, कार्यकर्त्यांचे सशक्तीकरण आणि देशव्यापी जनसंपर्क अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला. महाराष्ट्र व मणिपूर राज्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा दर्शवित, हा निर्णय पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
संघटन पर्वाच्या माध्यमातून भाजपा देशभरात नव्या ऊर्जेने संघटन बांधणी करत असून, आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावी होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नबीन यांचा नामांकन अर्ज दाखल, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या प्रस्तावक मंडळात खा.डॉ.अजित गोपछडे यांचा समावेश

0Share
Leave a reply












