तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील राष्ट्रीय महामार्गावरून मुख्य रस्त्यावरील वाचनालयापर्यंत करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाबाबत ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नव्याने दर्जेदार रस्ता न करता जुन्याच रस्त्यावर वरवर डांबरीकरणाची मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप होत असून, संबंधित ठेकेदारांनी घाईघाईत काम उरकून स्वतःचे “उखळ पांढरे” करून घेतल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. परिणामी या कामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या रस्त्याचा लोकार्पण सोहळा १ जानेवारी रोजी आमदार राणादादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत मुख्य रस्त्याचे काम दर्जेदार झाल्याचे सांगितले जात असले, तरी राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित कामाबाबत मात्र नागरिकांत तीव्र नाराजी आहे. दिशाहीन नियोजन, निकृष्ट दर्जा आणि अर्धवट कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तब्बल १४ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून, वारंवार आंदोलने व मोर्चे होऊनही ते पूर्ण होताना दिसत नाही. उड्डाणपुलाची अवस्था देखील तशीच असून, उड्डाणपुलाखालील रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अर्धवट व दर्जाहीन कामांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते पवन घुगरे यांनी आंदोलन केल्यानंतरच संबंधित यंत्रणांनी थातूरमातूर कामास सुरुवात केली. मात्र, सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांत अजूनही शंका व्यक्त होत असून, जबाबदार अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग ते मुख्य रस्त्याचे ‘चांगभले’…! जुन्याच रस्त्यावर घाईघाईने डांबरीकरणाची मलमपट्टी

0Share
Leave a reply












