नांदूर प्रतिनिधी ( किरण थोरात) : संपूर्ण दौड तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या चुरशीच्या पोट निवडणुकीत विशाल नरेंद्र थोरात यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत नांदूरच्या जनतेने विशाल थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत त्यांची सरपंचपदी वर्णी लावली आहे. तर दुसरीकडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच विशाल थोरात यांनी गावात जनसंपर्क आणि विकासकामांचा अजेंडा राबवत मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच थोरात यांनी आघाडी घेतली होती, जी अखेरपर्यंत कायम राहिली. विजयाची अधिकृत घोषणा होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. ‘नांदूरच्या विकासासाठी जनतेने दिलेला हा कौल आहे,’ अशा भावना नवनिर्वाचित सरपंचांनी व्यक्त केल्या.
ही निवडणूक संतोष बोराटे यांच्यासाठी आणि पर्यायाने रुपाली चाकणकर यांच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, नांदूरच्या मतदारांनी प्रस्थापित सत्तासमीकरणांना बाजूला सारत बोराटे यांना डावलले आहे. मोठ्या नावांचे वलय असूनही मतदारांनी स्थानिक प्रश्नांना आणि नव्या नेतृत्वाच्या पर्यायाला पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.
या पोट निवडणुकीच्या निकालामुळे गावातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विशाल थोरात यांच्या रूपाने गावाला आता तरुण आणि आक्रमक नेतृत्व मिळाले असून, आगामी काळात रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
नांदूर सरपंच पोटनिवडणूक: जनतेचा कौल विशाल थोरात यांच्या बाजूने ; संतोष बोराटे यांना पराभवाचा धक्का

0Share
Leave a reply












