SR 24 NEWS

इतर

देगलूरच्या रुग्णालयासाठी 22.97 कोटी रुपयांचा निधी मंजूर : खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश ; रुग्णांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

Spread the love

नांदेड (प्रतिनिधी) : देगलूरसह परिसरातील रुग्णांना दर्जेदार आणि तातडीची आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, रुग्णांना वेळेवर उपचार मिळून जीवदान मिळावे या उद्देशाने राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, देगलूर येथे तब्बल २२ कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक आरोग्य सुविधायुक्त  १०० खाटांच्या श्रेणीवर्धित शासकीय रुग्णालयास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिल्याने नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत मोठी भर पडणार आहे.

कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर वसलेला देगलूर तालुका हा व्यापारी, सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. देगलूर शहर हे तीन राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नांदेड जिल्ह्यातील नांदेड नंतर सर्वात मोठे शहर असल्यामुळे येथे अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, अद्ययावत वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे येथील नागरिकांना उपचारासाठी नांदेड किंवा इतर शहरांकडे जावे लागत होते. 

या पार्श्वभूमीवर १०० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा निर्णय हा स्थानिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नव्या रुग्णालयामुळे आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवरच मिळणार असून, सीमावर्ती भागातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे.

या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे. मंत्रालयीन स्तरावर विविध बैठका, पत्रव्यवहार आणि संबंधित विभागांशी सातत्यपूर्ण समन्वय साधत त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने देगलूरच्या विकासाला नवी गती मिळाली आहे.

“सीमेवरील आरोग्याची निकड, शासनाची विकासाची फुंकर; देगलूरमध्ये आता उपचारांचा नवा सुगंध दरवळणार!”अशा शब्दांत स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, हा निर्णय सीमावर्ती भागासाठी आरोग्यसेवेचा नवा अध्याय ठरणार आहे.

देगलूरसारख्या सीमावर्ती भागात अत्याधुनिक सुविधांसह दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!