राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात घरफोडीतून सोन्याचे दागिने चोरीस गेलेली घटना ताजी असतानाच, शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडून सुमारे ८० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ब्राम्हणी बसस्थानकाजवळ तसेच रहदारीच्या राहुरी–सोनई मार्गालगत ‘सुयश कलेक्शन’ व ‘महेंद्र प्रोव्हीजन’ ही कापड व किराणा मालाची दुकाने आहेत. या दुकानांचे मालक महेंद्र संकले यांनी शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी प्रस्थान केले होते. मध्यरात्री २ ते ३ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी काउंटरमधील अंदाजे ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दुकानाचे शटर वाकलेले दिसून आले. त्यांनी तातडीने दुकानमालकाला माहिती दिली. घटनेची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पीएसआय समाधान फडोल, पोलीस कर्मचारी अशोक झिने व चांद पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी नगर येथून श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पथकातील कर्मचारी डाके व गायकवाड यांनी घटनास्थळावरून ठसे व अन्य पुरावे गोळा केले आहेत.
भररस्त्यावर असलेल्या दुकानाचे एवढे मोठे शटर उचकटून चोरी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a reply













