राहुरी प्रतिनिधी:ज्ञानेश्वर सुरशे
- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात दि. १७ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, राहुरी तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करून नागरिकांसाठी विशेष खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.
प्रशासनाने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना:
झाडाखाली उभे राहू नका: वीज चमकत असताना किंवा वादळी वारा वाहत असताना झाडांचा आश्रय घेऊ नका. विजेपासून बचावासाठी सुरक्षित पक्क्या इमारतीत आश्रय घ्यावा.
विद्युत उपकरणांपासून दूर राहा: पावसादरम्यान घरातील विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. वीज वाहक तारा, ट्रान्सफॉर्मर, टॉवर्स आणि धातूच्या कुंपणांपासून लांब राहावे.
शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी: शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला माल भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.
पर्यटकांना इशारा: धरण आणि नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी पाण्याचा प्रवाह पाहूनच निर्णय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
मैदानात असल्यास: जर तुम्ही मोकळ्या मैदानात असाल आणि वीज चमकत असेल, तर गुडघ्यावर बसून हाताने कान झाकून घ्यावेत, जेणेकरून जमिनीशी संपर्क कमीत कमी येईल.
आपत्कालीन संपर्क:
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने जवळचे पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा ०२४१-२३२३८४४/२३५६९४० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












