SR 24 NEWS

जनरल

खासदार निलेश लंकेंना नेतृत्व सिद्ध करण्याची संधी ! संघटन कौशल्य, जशास तसे सडेतोड, प्रचंड मेहनतीने महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत छाप

Spread the love

विशेष प्रतिनिधी अ.नगर / वसंत रांधवण : नुकतेच एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी खंत व्यक्त केली की, अद्यापही काहीजण आपले नेतृत्व मान्य करण्यास तयार नाहित. आता हाच धागा पकडून अहमदनगर, महाराष्ट्रच काय पण दिल्ली म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व सिद्ध करण्याची मोठी संधी अहमदनगरकरांनी खा. निलेश लंके यांना दिली आहे. संघटन कौशल्यासह प्रचंड मेहनतीची तयारी आणि प्रसंगी समोर कोण आहे हे न पाहता जशास -तसे सडेतोड उत्तर देण्याची आक्रमकता तसेच प्रथम ग्रामपंचायत सदस्य व सरपंच नंतर जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीवर निवड त्यानंतर एक टर्म आमदारकी रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेचे सदस्य, कोव्हीड सारख्यां महाभयंकर संकटात म्हणून महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी करून काम करण्याची संधी मिळालेल्या खा. निलेश लंके यांनी नेतृत्व सिद्ध करून नेतृत्व न मानणाऱ्यांना धमक दाखवून दिल्यास अहमदनगरला नक्कीच सक्षम नेतृत्व मिळणार आहे.

देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय कृषिमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदी महत्वाची सत्तास्थाने भूषविणारे महाराष्ट्राचे नेतृत्व शरद पवार यांच्या कौटुंबिक सदस्य म्हणून आणि त्यांच्या सदस्यांच्या सहवासात राहून निलेश लंके यांना राजकीय फायदा झाला. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत समाजकार्याच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करण्यात निलेश लंके यशस्वी झाले. पदविधर शिक्षीत असलेले निलेश लंके यांनी राजकारणात प्रवेश करतानाच शिवसेना शाखा प्रमुख ते शिवसेना तालुकाप्रमुख राहुन विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नेतृत्व करून आमदारकी पटकावली. निलेश लंके यांच्या नेतृत्वासह कार्यशैलीत मागिल काही वर्षात काही वर्षात फरक झाल्याचा सर्वश्रुत आहे.

आमदारकीच्या पहिल्या टर्मपासूनच निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. माजी आमदार विजयराव औटी यांच्या सहवासात राहून तयार झालेल्या आणि शिवसेनेवर मजबूत पकड निर्माण केलेल्या काहींनी विजयराव औटी यांनाच डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला खरा पण अशा अनेकांना बाहेरचा रस्ता दाखविला गेला. त्याचवेळी निलेश लंके यांचे नेतृत्व कसब दिसून आले. प्रसंगी घरातील विश्वासू म्हणविणाऱ्यांना पण लंके यांनी त्यांची जागा दाखविल्याने पारनेर शिवसेनेवर निलेश लंके यांचा दबदबा दिसून आला. इतकेच काय तर पारनेर नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता होती, पण आमदारकीच्या जोरावर सत्तांतर घडवून आणले. शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे पारनेर मध्ये अनेकांना संधी मिळालेली आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रस्थापितांप्रमाणे वागणाऱ्यांना निलेश लंके यांनी सबक शिकवल्याची अनेक उदाहरणे आहेत. खा. निलेश लंके हे शांत दिसत असले तरी ते आक्रमक राजकाणी आणि प्रसंगी कोणालाही जशास – तसे सडेतोड उत्तर देण्याची धमक त्यांच्यात आहे. हे अनेकदा दिसून आलेले आहे.

लोकसभेला याचे उत्तम आणि उदाहरण म्हणजे राजकीय धुरंधर बाळासाहेब विखे यांचे नातू आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी जेंव्हा काही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोरच निलेश लंके यांनी कोण सुजय विखे असे म्हणून आक्रमक नेतृत्वाची झलक दाखवून देऊन विखे पाटील यांना पराभूत करून झलक दाखवून दिली. निलेश लंके यांचा हा आक्रमकपणा महाराष्ट्रभर चांगलाच गाजला. त्यानंतर आता खासदार झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात खा. निलेश लंके यांनी जिल्ह्यातील भाजपच्या शिर्ष नेतृत्वावर थेट आरोपांचा हल्लाबोल करत खासदारकीची टर्म आक्रमकच असणार हे स्पष्ट दर्शवले.

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली लोकांनी आपल्याला एक टर्म आमदारकी, आता खासदारकी दिली आहे. तरीपण काहीजण अद्याप आपले नेतृत्व मान्य करीत नसल्याची खंत जरी लंके यांनी व्यक्त केली असेल तरी याद्वारेच निलेश लंके यांनी नेतृत्व न मानणाऱ्यांना देखील एकप्रकारे इशाराच दिला आहे की, नेतृत्व मान्यच करावे लागेल. पण हा इशारा देताना आता खा. लंके यांना नेतृत्व सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.
येवू घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत खा. लंके यांनी नेतृत्व दाखवून जिल्ह्याची धुरा हाती घेवून महाविकास आघाडीतून जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील आमदार महाविकास आघाडीचेच निवडून आणून जिल्ह्यातील आमदारांची संख्या वाढवून दाखवण्याची गरज आहे. आता केवळ दोन ते तीन आमदार होते पण आगामी काळात महाविकास आघाडीचे जिल्ह्यात आमदार वाढविण्याचे नेतृत्व कौशल्य खा. निलेश लंके यांना दाखवावे लागणार आहे. येत्या काही काळातच नेतृत्व न मानणाऱ्यांना आपले नेतृत्व सक्षम असल्याचे दाखविण्याची संधी खासदार निलेश लंके यांच्याकडे आहे. आणि अहमदनगरकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ते पाहणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!