राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी विद्यापीठ परिसरात एका दिव्यांग व्यक्तीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून त्यांना व त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादी हे अंध व अपंग आहेत हे माहीत असतानाही आरोपींनी हे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, आरोपींनी घरातून मोबाईल चोरून नेला आणि त्या मोबाईलमधील फोन पे द्वारे फिर्यादीच्या बँक खात्यातून संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने २२,४०२ रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूकही केली आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १) अरुणा नाना हिवाळे, २) पुष्पा नाना हिवाळे, ३) विशाल नाना हिवाळे (सर्व रा. दुसरबीड, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) आणि ४) अर्चना विष्णू भातसोड (रा. माळेगाव, ता. व जि. जालना) अशा चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानदेव नामदेव गायकवाड (वय ४०, रा. राहुरी विद्यापीठ, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना दि. ०१/०६/२०२६ रोजी सायंकाळी ०५:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहुरी विद्यापीठ येथील राहत्या घरी घडली. आरोपींनी फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला आणि “मुलगी माझ्या ताब्यात द्या” असे म्हणून फिर्यादी तसेच त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. फिर्यादी हे अंध आणि अपंग आहेत हे माहीत असूनही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
यानंतर आरोपींनी घराच्या खिडकीत असलेला फिर्यादीचा मोबाईल चोरून नेला. त्या मोबाईलमधील ‘फोन पे’ ॲपचा वापर करून फिर्यादीच्या बँक खात्यातून २२,४०२/- रुपये आरोपी क्रमांक १ (अरुणा हिवाळे) हिच्या खात्यावर बेकायदेशीरपणे ट्रान्सफर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केली. या घटनेबाबत दि. २३/०६/२०२६ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३३, ३०३(२), ११५(२), ३५१(२), ३५२ सह दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कलम ९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राहुरी विद्यापीठ परिसरात दिव्यांग व्यक्तीला मारहाण करून ऑनलाईन फसवणूक ; चौघांवर गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












