नांदेड प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : नांदेडसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीविषयी आज राज्यसभेत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी चर्चा घडवून आणली. मराठवाड्याच्या कृषी समस्यांकडे लक्ष वेधताना, कमी पर्जन्यमान आणि कमी जलधारण क्षमता लक्षात घेऊन नांदेड येथे ड्रायलँड रिसर्च सेंटर स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अशा संशोधन केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्र सरकार सकारात्मक प्रयत्न करेल, असा विश्वास दिला.
मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष अद्याप पूर्ण भरून न निघाल्याने शाश्वत शेतीला अपेक्षित बळकटी मिळालेली नाही. परिणामी, शेती मोठ्या प्रमाणात निसर्गावर अवलंबून असून उत्पादनात घट आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मराठवाडा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागे राहिल्याचे चित्र दिसते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन मराठवाड्यातील शेतीला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. हैदराबाद येथील संस्थेपर्यंत शेतकऱ्यांची मर्यादित पोहोच लक्षात घेता, नांदेड येथे Central Research Institute of Dryland Agriculture (CRIDA) ची शाखा स्थापन केल्यास स्थानिक पातळीवर तांत्रिक मार्गदर्शन मिळून शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय होऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संदर्भात उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मराठवाड्यासारख्या अवर्षणग्रस्त भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, या भागात ८२ टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ, ८०० पेक्षा अधिक हवामान-अनुकूल पिकांच्या जाती आणि ८६ क्लायमेट-स्मार्ट तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात अशा संशोधन केंद्रांच्या स्थापनेवर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेडमध्ये ड्रायलँड रिसर्च सेंटर स्थापन होणार : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रश्नांवर केंद्रीय कृषिमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

0Share
Leave a reply












